Tuesday, 28 July 2020

२०. भावबंध


हे भावबंध
कसली गुंतागुंत
केलीस तू रे

एकदा सांग
नजरेत अथांग
दिसले  झरे

वाटते आज
लाटावरची गाज
स्वप्नाची या रे

एकच शर्थ
लागावे मज अर्थ
शब्दाचेच हे

- जुईली अतितकर






Sunday, 26 July 2020

३१. शाहीद



दूर तिथे त्या सीमेवर 
तो काल लढला होता 
शहीद झाला तरीही 
तो शत्रूला भिडला होता

देश आणि वेस तेव्हा 
सारेच धोक्यात होते
एक निशाणा त्याने
तेव्हाच रोखला होता

घरदार सुखी संसार
साराच पसारा होता
पण देशाचा मान
त्याला जास्त प्यारा होता

स्फुरण आणि स्मरण 
दोन्ही ठेवून गेला मागे
देशासाठी प्राण त्याने
तेव्हाच सोडला होता

- जुईली अतितकर

Wednesday, 22 July 2020

३२. श्रावण

आलाच तो 
दुथडी भरून वाहू पाहतो
दवा थेंबात अजि नाहतो
खोल खोल दर्यावर भरती घेऊन 
आलाच तो...श्रावण

मुसमुसणाऱ्या शुभ्र कळ्यांत
पिकल्या हिरव्या कुंद मळ्यात
पानगळीच्या गिष्मा मागे टाकून 
आलाच तो...श्रावण 

मोरपंखी रंगाची उधळण
सुख सौख्याची झाली गुंफण
दुःखाच्या वाटा चुकवून आज 
आलाच तो...श्रावण

- जुईली अतितकर




Thursday, 16 July 2020

१८. हरवलेलं पत्र

बऱ्याच दिवसात शोधतेयं
एक पत्र हरवलेलं
खूप शोधलं, हुडकून काढलं
तेव्हा जे मिरवलेलं
वाचलं ही होतं थोडं फार
नाव गाव नव्हते, फक्त शब्द चार
बरंच काही लिहिलं होतं
कवितेची प्रतिक्रिया, कथेची नायिका
गूढ गुपित आणि बरंच काही
चारोळीत मावेल आणि कादंबरीत ही शिल्लक उरेल अशी ती साद
उत्स्फूर्तपणे मिळालेली दाद
चुकून आले का कुणाच्या पत्त्यावर
ते पत्र हरवलेलं 
शोधतेय मी अजूनही 
माझ्यासाठी जे गिरवलेलं

- जुईली अतितकर

Wednesday, 15 July 2020

१९. वाट

वाट नजरेसमोरची 
अरुंद आणि वळणाची
पाहत बसले बराच वेळ का
पण जाण्याचा मोह झालाच नाही...
होत्या त्यावर बऱ्याच 
लहान मोठ्या करवंदाच्या जाळ्या
नारळाच्या झावळ्या, वडाच्या पारंब्या
पण सुरवातीच्या निवडुंगाच्या 
काट्यांनी रस्ता दिलाच नाही.
आणि पुन्हा जाण्याचा मोह झालाच नाही...

- जुईली अतितकर

Sunday, 12 July 2020

१७. झाली होती सुरवात



झाली होती सुरवात
थोडं थोडं शिकायला 
आणि थोडं शिकवायला
तोडक मोडक तत्वज्ञान जगासमोर मांडायला
भल्या मोठ्या सागरात डुबता डुबता पोहायला 
झाली होती सुरवात ....

झाली होती सुरवात 
जंगलात फिरायला 
फिरता फिरता वाटेवर थांबायला
आले गेले प्राणी पक्षी निरखून चालायला
जाता जाता एक वार स्वतः वर घ्यायला 
झाली होती सुरवात ....

झाली होती सुरवात 
वाऱ्यावरती उडायला
उंचावरून निळे निळे आकाश पाहायला
आकाशातुन दिसणारा एक ठिपका दडलेला
ठिपक्यात लपलेलं आपलं घर सोडलेला
झाली होती सुरवात .....
त्या ठिपक्याला शोधायला

- जुईली अतितकर

३३. निरोप


सोडून साथ आता येथून दूर जाणे
दाटून कंठ येतो साऱ्याच आठवाने ||

तुमच्याच संगतीने फुलले मळे स्वरांचे
आता खुणावती ते स्वर आर्त भैरवीचे
सरता वसंत येथे मी पाहिला नव्याने ||

येथे अनंत रूपे दिसली दया घनाची
पूजले तनामनाने सेवा सदैव त्याची
चुकले असेन कोठे विसरून सर्व जाणे ||

अपुरे अभंग नाते राहोत स्नेहबंध
सहवास संपताना यावा सुरेख गंध
संगे स्मृती फुलांनी उरला प्रवास पहाणे ||

आरास आसवांची डोळ्यात मांडलेली
सांजावता दिशांनी मज साद घातलेली
घेते निरोप आता  भरल्या या मनाने ||

- जुईली अतितकर

३४. साथ


वृद्धत्वाच्या वळणावरून वळून, पाहिलं मागे जेव्हा
आधाराचा नव्हता हात, रस्ता होता मोकळा तेव्हा 

वळून मागे पाहताना, माझं आयुष्य मलाच हसलं
विराण एकट्या आयुष्यात, एकाकी जीवन दिसलं 

पुढचा प्रवास भयाण हसला, समोर सगळा काळोख दिसला
वृद्धाश्रमाची वाट दाखवून, मनातच तो रडत बसला 

थकलं शरीर सोडून साथ, वेदनांनी जवळ अलगद घ्यावं
उरल्या सुरल्या वाटा सोडून, वाटत जगाला अलविदा म्हणावं 

- जुईली अतितकर

३५. असे नाही


विश्व आहे लहान माझे
रमवते त्यात क्षण काही
इतरांना त्यात जागा नाही
इतके मात्र सान नाही

शांत आहे डोह मनाचा
शब्दाची त्यात गर्दी नाही
वेचले तर ओंजळ भरेल
इतकीही मी अबोल नाही

वेळ बदलली बऱ्याचदा
काळ आजही सरला नाही
नशीब ही बदलत खरं
मनगटी जोर संपला नाही

तुला वाटेल सरळ जरी
वाट माझी साधी नाही
वळणाची ही सवय झाली
हरवण्याची मज भीती नाही

स्वप्न माझी असली मोठी
जगाची मला पर्वा नाही
नाते लोटून पुढे जाईन
असे मात्र होणार नाही

- जुईली अतितकर

३६. आभासी वास्तव्य


तुझं आभासी वास्तव्य, कधी कळलंच नाही मला
तेव्हा आणि आजही तिथेच शोधत बसते तुला

क्षितीजाच्या पलीकडे आज ही दिसते तुझेच प्रतिबिंब
माहीत नाही मैलभर प्रवास आहे तरी किती लांब

पिंपळाची पाने देतात, वाऱ्याने स्पर्शाचा भास
पुन्हा एकदा परतण्याची, अजून असते मनी आस

तुझ्या आभासी हास्याची, खळी पाहते मी आकाशी
तुझ्या आवाजाची साद येते, त्या गावच्या वेशीपाशी

सरसरणाऱ्या पालवीवर, एकदा फक्त येऊन जा
तुझ्या आभासी विश्वाची, किल्ली तेवढी देऊन जा

- जुईली अतितकर

३७. जगलेले क्षण


जगलेले क्षण का कधी सहज पाठ सोडतात ?
आठवणींच्या कोड्यामध्ये, एक एक पान जोडतात.

जगलेले क्षण का कधी आपले मन मोडतात
घेऊन जातात दूर अन, अर्ध्यावर रस्ता सोडतात

जगलेले क्षण जेव्हा, डोळ्यासमोरून पळतात
फोटोमधले चेहरे सुद्धा, तेव्हा अचानक बोलतात

जगलेले क्षण नंतर, भयंकर सलतात
हळूहळू धागे दोरे, सगळेच कळतात

जगलेले क्षण का कधी सहज पाठ सोडतात ? 
ध्यानी मनी आजकाल, स्वप्न ही तशी पडतात

- जुईली अतितकर

३९. मन माझे फुलपाखरू


दाट धुक्याच्या दवात भिजले, मन माझे वाटसरू
कोवळ्या हिरव्या देठावर, जसे फिरते फुलपाखरू

अंधार कालचा कोशातला, मोडून ते निघाले
विणलेल्या जाळ्यात जे, गुंतून होते बसले

भिंती रितेपणाच्या फोडून, रंग आज बरसले
निळ्याशार पाण्यात तयाला, प्रतिबिंब आपले दिसले

पंख फुटले होते नव्याने, मोकळ्या दिशा आकाशी
सोबत आपले पराग उधळीत, होते रंगाच्या राशी

मन माझे त्या फुलपाखरासम, कधी रंगबेरंगी झाले
बागेमधल्या फुलावरी आज, पुन्हा होते गवसले

मोहित होऊन फुलबागांवर, विहार करते आता स्वप्नी
आपल्याच कांतीचा विसर पाडून, स्वच्छन्दी उडते मनी

मन माझे आज पुन्हा, झाले ग फुलपाखरू
छंद लागला उडण्याचा, कसे आता सावरू

- जुईली अतितकर


१६. प्रकाशवाटा



तू वात हो दिव्याची दिवा मी होईन
तू साथ दे प्रकाशाला जळत मी राहीन

तू तारा हो अखंड  चंद्र मी होईन
तेज तुझे असले तरीही रात मी पाहीन

तू अंतरीचा श्वास अन देह मी होईन
प्राण तुझा असेल तोवर जिवंत मी राहीन

तू छेडलेली तान त्यात संगीत मी देईन
मंजुळ तुझ्या लहरीत जग माझे तल्लीन

तू फक्त शब्द हो लेखणी मी होईन
मांडून सारे एकत्र कथा मी लिहीन

- जुईली अतितकर

१५. दिवाळी शुभपर्व


आली आज दिवाळी, सोन सकाळी
सडा रंग रांगोळी, रेखीली अंगणात
सणाचा उत्साह, पक्वनाचा मोह
जिव्हाळ्याचा स्नेह, सजवला मनात

उंबऱ्यात नक्षी छान, पावलांची खूण
फुलमाळाची तोरणं, सजली दारात
चैतन्याची लयलूट, नाती जोडती अतूट,
थोरामोठ्याची भेट, झाली ग घरात

वात भिजली तेजाने, नांदती सौख्याने,
ज्योती प्रखर नित्याने, जळती दिव्यात
प्रकाशाच्या पर्वाने, बोलले गाऱ्हाणे
चमकती हो चांदणे, फुलवीत रात

यावी तुझ्या ही घरी, घेऊन आनंद सरी
लख्ख दिशा या चारी, दिवाळी जोरात
किल्ले रचून मातीचे, भिंती फोडून जातीचे
हात जोडून साथीचे, करू संकटावर मात

- जुईली अतितकर

न बोलता


न बोलता जर भरलं रित पोट
न बोलता रंगले गुलाबी ओठ
तर कशाला ती लाजेची बुजरी मर्यादा
कशाला तो वेगळा औपचारिक गोठ

बोलून कुठे कोणी जिंकलंय मैदान
बोलून कुठे झालाय लोकांना बोध
बोलल्याने नेहमी विणले पाश
बोलल्याने लागला अस्तित्वाचा शोध

बोलणं घालते घाव कधी
बोलणं येत कधी जीवावर
बोलून प्रश्न सुटले असतील
कसरत तरी झाली मनावर

बाष्कळ बडबड वाटेल कुणा
निमूठपणे पाहत बसावं
आहे त्यात समाधान मानून
मूग गिळून गप्प बसावं

- जुईली अतितकर

४२. मनाचा कोपरा


रंग रंगल्या भावनांनी, फुलला मोरपिसारा
साजशृंगारात सजवला, रीता मनाचा कोपरा

लाली उमटली गालावरती, खळी ठेवली गोंदवून
लख्ख खड्यात सजले, कर्णफुलातील कुंदन

काळ्या भुरळ्या बटांमध्ये, लपाछपीचा खेळ
वेणी त्यातही गुंतून सजवून, केला एकत्रच मेळ

गर्द पांढऱ्या मोगऱ्याच्या, कळ्या घेतल्या माळून
सुगंध त्याचा चहूकडे, मन करून गेला तरुण

काजळ काळ्या रंगात, कोरल्या मिनाक्षी नयनांना
रूप देखण्या सोहळा, केला आरशाने साजिरा

सौंदर्य खुलले नक्की कुठले, रंगी बेरंगी छटांचे
गुपित त्यात लपवून ठेवले, गुंतलेल्या भावनांचे

कोपरा हा मनाचा ठेविला, त्या नजरेत मी जपून
पाहते मी आजही त्याला, स्वप्नांमध्ये  रंगवुन 

- जुईली अतितकर

८४. बोलके डोळे


अबोल आपल्या नात्याला, बोलके डोळे पुरेसे

एकदा फक्त प्रयत्न कर, वाचून बघ जरासे


रंग रूप जगाचे पाहून, प्रश्न पडले मनाला

शब्द त्यात लपलेले, दिसले ना कुणाला


मन तरीही बदलण्याचा, अट्टहास तो किती केला

सांगत होते डोळे तरी, दिसला फक्त अबोला


बोलके डोळे आज ही, मन माझे वाचतात

अबोला ही सरून जाईल, नेहमी मला सांगतात

- जुई

१४. पणती तरीही तेवत होती


सूर्य मावळतीला आला
किरणे जणू कुठे हरवली
अंधार अजून गडद भासला
पणती तरीही तेवत होती...

रात्र डोक्यावरती आली
चंद्रकोर ही अंधुक दिसली
चांदण्यांचा खेळ संपला
पणती तरीही तेवत होती...

गर्द ढगांची गर्दी झाली
आकाश माझे व्यापून गेली
झडप जोरदार एक बरसली
पणती तरीही तेवत होती...

तेल तूप ही संपून गेले
वादळे मनीची आज उसळली
कोपऱ्यात एकटीच ती
पणती तरीही तेवत होती...

- जुईली अतितकर

१३. भाषा तुझी माझी


भाषा तुझी माझी
डोळ्यांना कळणारी
ओठावर रुळणारी
आनंद भरणारी

भाषा तुझी माझी
न पाहता दिसणारी
स्वप्नवत भासणारी
मनमोकळे हसणारी

भाषा  तुझी माझी
रागून मुटकून भिडणारी
काळजात थेट घुसणारी
नाते  आपले जोडणारी

- जुईली अतितकर

४३. आयुष्याची शाळा


फार फार जुनी आहे गंमत सांगते ऐका
आयुष्याची कोडी इथे सोडवायला शिका

डोळ्याच्या पापण्यातले आसू जरा बघा
थेंबभर दुःखात सोबत रडायला ही शिका

ओठावरच्या दारात उभे शब्द माझे ऐका
साद कानी पडताच तुम्ही वाचायला शिका

गाली कुणा लपलेलं स्मितहास्य टिपा
हसण्याचे कारण तुम्ही बनायला शिका

नाही सारे सोपे सरळ मनी ठासूनच ठेवा
साध्या साध्या वाटा कधी शोधायला शिका

मूठभर पोटासाठी थोडे राबायला लागा
तग सुटेल तरीही विश्वास ठेवायला शिका

खूप शिकवते फुकट ही आयुष्याची शाळा
शाळेत मात्र स्वतः साठी जगायला शिका.

- जुईली अतितकर


११. आतुरता बाप्पाच्या आगमनाची


आतुरता बाप्पाच्या आगमनाची
सजली आसने माझ्या बाप्पाची
बहरली वेल दारी मांगल्याची
लोभस रूप त्याचे पाहण्याची

आतुरता बाप्पाच्या आगमनाची
अज्ञानाकडून ज्ञानाकडे जाण्याची
तम सारून ज्योती सम पेटण्याची
नवा इतिहास यशाचा रचण्याची

आतुरता बाप्पाच्या आगमनाची
करू सुरवात नव्या ध्येयाची
मनी कास धरून प्रयत्नांची
सोबत असावी कायम आशेची

आतुरता बापाच्या आगमनाची
रास लागावी गोड नैवेद्याची
यावी झुंबड साऱ्या भक्तांची
सारी किमया आहे श्रद्धेची

- जुईली अतितकर

१२. तुझी माझी वेगवेगळी वाट


तुझी माझी जरी वेगवेगळी वाट
तरीही पडावी आपली गाठ 
चातकाचे जसे पावसाशी नाते
अशी असावी आपली साथ

आकाशात नभ दाटून यावे
उतरावे पायी धुके दाट
समुद्र ही तेव्हा शांत नसावा
उसळून यावी एकच लाट

वाटेवरती आपल्या आपण
पहावी एक सुरेख पहाट
विरोधी वारा शिवारावर तरी
टिकून राहावी ही रेशीमगाठ

- जुईली अतितकर

Saturday, 11 July 2020

४६. वाचेन मी


जाणिवा साऱ्या होतील ज्वलंत
जेव्हा गोंधळ मनीचा होईल शांत
मन तेव्हा मग भासेल निवांत
एक क्षण वाचेन मी तेव्हा तुला

मळभ काळा होईल तो दूर
सरून जाईल भावनांचा पूर
लागतील अवचित एक सूर
एक क्षण वाचेन मी तेव्हा तुला

प्रयत्नाचा डोंगर अलगद सर होईल
कंठ मनीचा अचानक दाटून येईल
मन माझे तेव्हा पाखरू होईल
एक क्षण वाचेन मी तेव्हा तुला

नाही म्हणत दिवस ही सरतील
काठ डोळ्यांचे अश्रूंनी भरतील
सोबत तेव्हा फक्त आठवणी उरतील
एक क्षण वाचेन मी तेव्हा तुला

- जुईली अतितकर

९. भाकरी


मिठापिठाची सांगड घालून
बनते माझी भाकरी

झटकन चटके हाती देऊन
फुगते माझी भाकरी

कष्टाची पहिली मिळकत
आणते माझी भाकरी

पिठल्या शेजारी दुमडून
शोभते माझी भाकरी

कौतुकाचे शब्द तोंडून
बोलते माझी भाकरी

पहिल्या वहिल्या प्रयत्नात
गोड हसते माझी भाकरी

गोरीगोमटी चंद्रासारखी
भासते माझी भाकरी

जिभेवरी आज ही लक्षात
राहते माझी भाकरी

येणार ना मग खायला
बोलावते माझी भाकरी....

- जुईली अतितकर

४७. माडीवरची बाहुली

माडीवरची बाहुली आज हरवलेली भेटली
हरवलेला माझा बाहुला परत द्याना म्हटली

खोट खोट मांडल होत घर आम्ही तेव्हा
शेगडीवरचा चहा सुद्धा केला होता पहा

बाहुली च खोटं खोट लग्न भारी जंगी केलं
गल्लीमध्ये सगळ्यांसोबत स्नेह भोजन झालं

आता तीच अडगळीत पडली  माझी बाहुली
म्हणली बाहुला सोबत नाही हरवली जणू सावली

चोरट्या नजरा चहूकडे मग कशी होईन सबळ
त्यापेक्षा सुरक्षित वाटते मला आता ही अडगळ

बाहुलीचा तर खेळ होता मोठेपणी संपला
बाहुला काही मिळाला नाही खेळ तिथेच थांबला

माडीवरची बाहुली आता आरशामध्ये दिसते 
उणीव तिच्या स्वप्नाची रोज आजकाल भासते

- जुईली अतितकर

८. स्वप्नांचा पाठलाग


स्वप्नांचा केला पाठलाग
तरी रस्ता सरला नाही
दिनरातची सारी कसरत
तरी गल्ला भरला नाही

अंतर हे सरतच नव्हते
तरी वाट बदलली नाही
पायपीट केली मैलभर
अन  दिशा भटकले दाही

वस्तीला दूरच होते
अन आडोसा ही नाही
परी विश्रांती ही तिकडे
क्षणभर घेतली नाही

वादळे आली शंभर
पण वाहत गेले नाही
लाटांवर झाले स्वार
तरी नाव बुडवली नाही

पाठलाग आहे हा चालू
अजूनही स्वप्नांपाठी
अंतर तिथले कदाचित
अजून ही संपत नाही.

- जुईली अतितकर

४८. अंतरीची वादळे


अंतरीची वादळे नसतात 
रस्ता चुकवणारी
कदाचित त्यातूनच धूसर वाट दिसते

अंतरीची वादळे पदोपदी येणारी
कदाचित त्यातूनच पुढचे पाऊल पडते

अंतरीची वादळे मला साद देणारी
आवाज अंतरीचा दहादिशी नेते

अंतरीची वादळे श्वास रोखणारी
आपली स्पंदने अलगद सावरते.

अंतरीची वादळे हुलकावणी देणारी
हळूच येऊन गुज मनाचे बोलते

अंतरीची वादळे शुभ्र पाण्यावरची
कधीतरी वाहत तळ नदीचा गाठते

- जुईली अतितकर

४९. आई माझी म्हणते

आई माझी म्हणते, मनमुराद जगावं
एक क्षण कधीतरी, स्वतः साठी हसावं

आई माझी म्हणते, मन मोठं असावं
पुढे जाण्याच्या शर्यतीत, आत्मकेंद्री नसावं

आई माझी म्हणते, रणरागिणी बनून लढावं
यश पाहून अभिमानाने, मूठभर मांस चढावं

आई माझी म्हणते, एखाद्यावर कधी तरी रुसावं
लाडी गोडी, मजा मस्तीत, प्रेम त्यांना दिसावं

आई माझी म्हणते, अडचणीत कधीतरी फसावं
वाट काढत कुठून तरी, बरोबर घरी येऊन बसावं

आई माझी म्हणते, दुसऱ्यासाठी कधीतरी झिजावं
आनंदाच्या दोन सरीत, सोबत  चिंब भिजावं

आई माझी म्हणते, मला मन मुराद जगावं
रोज आरशात आपलं, गोड प्रतिबिंब दिसावं

- जुईली अतितकर

४४ . आठवणीतला पूर


झाली स्वप्नांची माती, अन भावनांचा चिखल
अश्रूंच्या महापुरात, संसार तरी कसा टिकलं

पुसटशी आशा ही, आता देवा कुठेच दिसेना
विखुरलेल्या घराची घडी, काही केल्या बसेना

डोळ्यादेखत वाहून गेले, जे होतं साठवणीतलं
जपलेले उराशी आता, झालं रे आठवणीतलं

वादळात हरवल्या कशा, वाटा आज साऱ्या
नशिबाच्या पाट्या झाल्या, अचानक कोऱ्या

मागमूस लावताना जीव, पिळून च गेला
एक क्षण त्या घडीला, काटा अंगावर आला

लाटा झेलत झेलत आता, स्वर्गची गाठला
नांव आशेची घेऊन तेव्हा, देवच भेटला

- जुईली अतितकर

७. स्पर्श तुझा


रिमझिम पाऊस टीपटीपताना, कळी फुलातून कधी फुलताना
लाजाळूच्या स्पर्शासम भासे, आठवतो मग स्पर्श तुझा 

मंतरलेल्या संध्याकाळी, मंद दिव्यातून जळताना
चांदण्यातल्या प्रकाशातून हि, आठवतो मज स्पर्श तुझा 

आयुष्याच्या वाटेवरुनी, पुढे पुढे मी जाताना
कधी अचानक वाट बदलते, आठवतो मज स्पर्श तुझा 

शांत किनारी वाऱ्यावरती, लाटावरुनी पळताना
एक लाट या खोल सागरी, आठवतो मज स्पर्श तुझा 

भावभावना जाग्या होता, कधी एकटे असताना
सोबत भासे आज इथेही, आठवतो मज स्पर्श तुझा 

अंधार दाटता चहूकडे, मार्ग आपला शोधताना
एक हात आधार भासतो, आठवतो मज स्पर्श तुझा 

- जुईली अतितकर

५०. जगून बघा


वाटले ना कधी सगळे, आलबेल चालले
एकदा तेव्हा, जगासाठी जगून बघा

संपलं सगळं होत नव्हतं, प्रश्न बोलले
एकदा तेव्हा, त्यांना उत्तर सांगून बघा

आहे भरपूर, घ्यायला द्यायला आता पुरे झाले
एकदा तेव्हा, एक झोळी खोलून बघा

हरवलेले हसू पुन्हा, नव्याने  मिळाले 
एकदा तेव्हा, आरशात वाकून बघा

कधी लाज, ईर्षा, इगोचे मनोरे रचले
एकदा तेव्हा डबक्यात, पाय धुवून बघा

एकदा चूक कबूल करण्या, आसू गळाले
एकदा तेव्हा, दोन्ही हात जोडून बघा

- जुईली अतितकर

१०. स्वप्नांच्या जगात


एक स्वप्न पाहिलं मी मनात
मुक्त उडावे उंच आकाशात
आधार घ्यावा मजबूत पंखांचा
स्वच्छन्दी जगावे स्वप्नाच्या जगात

जावे कधी विरुद्ध वाटेने
नव्या दिशा अन वळणांची साथ
घेऊन सोबत विश्वासाचे बीज
रुजावे मातीत खंबीर हात

वाटते कोसळावे पावसासारखे
वाहावे रानावनातून घनदाट
शीळ घालून वाऱ्यावरती
फुलावे कधी पानाफुलात

शांत प्रवाहात वाहत जावे
गावे गाणे मंद स्वरात
उसळावे कधी लाटांवरती
पळावे एकटेच दूर सुसाट

स्वप्न असले गोड तरी
अंतर आहे ना वास्तवात
स्वप्नाच्या या दुनियेसाठी
पुरवून घ्यावी एखादी रात

- जुईली अतितकर


४५. एक वाट


एक वाट जाते माझ्या, घरापासून दूर
तिथून जाताना आज, भरून येतो ऊर 

वाट नागमोडी त्यावर, ढीगभर वळणे
जसे जावे पुढे तशी, ओलावतात मने 

वाटेवरचे खाचखळगे, बोचतात कधी कधी
माझ्या या घरातील, माणसं अगदीच साधी 

वाट जशी दूर जाते, गलबलते कधी मनी
ओशाळलेल्या मनामध्ये, सोबत फक्त आठवणी 

घरच्या चौकटीत गुंफलेली, आपुलकीची नाती
वाटते दूर गेल्यावर, होतील का मग रिती 

विश्वासाच्या जोरावर, मग जावे कधी दूर
प्रेम आणि आपुलकीने, मिळवावे हरवलेले सूर 

- जुईली अतितकर


Friday, 10 July 2020

४. रातराणी

हास्य तुझे जसे
फुललेला चाफा
केसात माळूनी
उजळते रूपा
मनात उमललेली 
मोगऱ्याची कळी
रातराणी आज
कशी फुलली अवेळी...

- जुईली अतितकर

५. आयुष्याचे पुस्तक


आयुष्याचे पुस्तक 
देते अनुभवाला दत्तक
एक पान भरलेलं 
एक कोर उरलेलं
सुरवात त्याची केली कुणी
कुणी मिसळल्या आठवणी
पाने भरत गेली फक्त 
पुस्तक तेवढे झाले मुक्त...

- जुईली अतितकर

५६. पाऊस


वेगळे काही आज सांगत नाही 
चातकासम वाट ही पाहत  नाही 

शिंपडणे आज तुझे असे अवेळी 
काळ्या मातीला ओलावत नाही 

झिरपणे तुझे टिपूस थेंबातूनी 
मोहरून फुलाला सुखावत नाही 

आला ना दूरच्या प्रवासातुनी  
तरी ग्रीष्म मनीचा सरत नाही 

तहान माझ्या कवितेची भागवण्या 
मन आताशा तेवढे झुरत नाही 

कधी ओंजळीत ये मोतीच बनुनी 
दवात मन माझे ही  रमत नाही 

येशील तू मग बरसूनी अंगणी  
थांबण्याचा हट्ट कुणी करत नाही  

- जुईली अतितकर

६. जे तुटले होते धागे


जे तुटले होते धागे 
ते जोडून बघते आज
जे रुतले होते काटे
ते काढून बघते आज 

बघ उरले काही असले
ते उरकून घेते आज 
फुलले सुरेख रूप 
चढवून बघते साज

झालाच उशीर तरी
पूर्ण करतेच आज 
शिल्लक नसावी मागे
कोणतीच इच्छा राज 

उसवले गेले हातून
ते शिवून घेते आज
धागा धागा जोडताना 
सजेल सुंदर ताज 

- जुईली अतितकर

५१. बदलावं जगाला


एकदा वाटलं मला, बदलावं जगाला
घाव घेत घेत, कोलमडलेल्या  मनाला

एकदा वाटलं मला, बदलावं जगाला
फिक्या झालेल्या रंगावर, साज नवा द्यायला

एकदा वाटलं मला, बदलावं जगाला
रखडलेला गाडा पुन्हा, नव्याने रांधायला

एकदा वाटलं मला, बदलावं जगाला
सुकलेल्या पानांवर ही यावा पुन्हा तजेला

एकदा वाटलं मला, बदलावं जगाला
वेगाने पळणाऱ्या, नात्यांना साधायला

एकदा वाटलं मला, बदलावं जगाला
गर्दीत हरवलेल्या, माणसाला शोधायला

जगाने आज शिकवले मला,
बदल नाही सोपा हा आरशात बघ स्वतःला...

- जुईली अतितकर

३. एक कविता

एक कविता अशी माझी 
उतरावी अलगद पानावरती
टिपले जावे शब्द माझे 
कोरून राहावे मनावरती
विसर पडावा कधीतरी
अन तल्लीन व्हावे चालीवरती 
गुणगुणावी कधी आपलीच कवीता
अन मन यावे भानावरती
एक कविता अशी माझी....

- जुईली अतितकर

२. नभ ही दाटून आले

नभ हि दाटून आले ओसरीवर माझ्या
मांडून ठेवल्या होत्या, जिथे आठवणी तुझ्या...

भिजून चिंब झाली, एक अशीच डायरी
त्यात सांभाळलेल्या शब्दांच्या सरी
वाफाळलेला चहा आणि कवितेच्या लहरी
पावसाचा गारवा, मनाचा ओलावा 
एकच उमटली शिरशिरी...

खेळ सुरू होता बाहेर पाण्याचा
साठवला हा खजिना काही क्षणाचा
पुन्हा येणे कधी योजले असावे त्याने
तेव्हाच निरोप ही आला होता पावसाचा...

नभ हि दाटून आले ओसरीवर माझ्या
मांडून ठेवल्या होत्या, जिथे आठवणी तुझ्या...

- जुईली अतितकर

१. नाते प्रेमाचे

कळले आहे मजला हे नाते प्रेमाचे,
शोधत गेले कुठवर गाव मी त्याचे

वस्ती छोटी माझी होती कौलाच्या घरांची,
वस्तीतूनच दिसले आहे क्षितिज दुरवरचे

वाट नागमोडी त्याला वळणे होती फार,
हमरस्त्याला लागले माझे पाय आशेचे

नाते विणले सुंदर जणू नक्षत्रांच्या माळा,
सोबत आपसूक आले तेव्हा धागे मायेचे

कळता कळता जुळल्या वाटा वळणावरच्या
आणि कुठवर शोधत गेले होते गाव प्रेमाचे

- जुईली अतितकर


६०. सोबत

ओल्या साऱ्या जखमांवर
फुंकर गोड शब्दाची
उसळलेल्या दर्यावर
मौज असते वाऱ्याची

कोसळत्या पावसावर 
सुंदर गाणी सरींची
थिरकत्या पायावर
गोडी पैंजण चालीची

पर्वताच्या माथ्यावर
सोबत मोठ्या पंखांची
दगड विटांच्या भिंतीवर
रचना गोल खांबांची

भरकटलेल्या वाटेवर 
पायवाट झाली सोयीची
बहरलेल्या झाडावर
वेल फुलली जाईची

- जुईली अतितकर

६३. श्वास

श्वास
अंतरीचा भास
अविरत मिळालेला सहवास
जीवनाला कायम लागलेला ध्यास

श्वास
प्रीतीचा मधुमास
फुललेला वसंत सुवास 
ओळखीचा वाटणारा अनोळखी आभास

श्वास 
लढण्याची आस 
जिंकण्याचा केला अट्टाहास
उमेदीवर ठेवलेला अढळ विश्वास

- जुईली अतितकर

Thursday, 9 July 2020

५२. बाबांच्या डोळ्यामध्ये पावसाचे ढग



आई आई ये ना जरा, बाबांकडे बघ
बाबांच्या डोळ्यांमध्ये, पावसाचे ढग

बाबा असा बघायला, दिसे ना गं बरा
अळी-मिळी गुपचिळी, पडलेला वारा

हले नाही डुले नाही, जणू काही फोटो
आवाजही त्याला, माझा लांबूनच येतो

उभा तर उभा, बसे तर बसे
हसे तेव्हा अजूनही, कसनुसा दिसे

विचारले “ बाबा, काय पाहतोस सांग? ”
बाबा म्हणे “ आभाळाचा लागतो का थांग ? ”

काय सांगू पोरी, तुला कळणार नाही
आभाळ ना आले हाती,जमीन हि नाही.

चहूकडे कोंडलेल्या, जगण्याच्या दिशा
हाती नाही काम गाडा, चालायचा कसा ?

मोठा झाला परी, शिकला नाही बाबा
विकायच्या जगामध्ये, टिकला नाही बाबा

तेव्हा बाबा उठूनिया, कुशीमध्ये घेतो
ओले डोळे पुसूनिया, ओली पापी घेतो

घाबरतो जीव बाबा, असं काय बोले
चित्रातले रंग त्याच्या, जसे अजूनही ओले

चेहऱ्याचा रंग त्याचा, सांग कुठे गेला
हसणारा बाबा कुणी, पळवून नेला ?

- जुईली अतितकर

वाट माझी

वाट माझी वळणाची  हिरव्या पानात वाट माझी सजलेली  निबीड रानात  वाट माझी नागमोडी  डोंगर दऱ्यात वाट माझी बाभळीच्या  सघन खोऱ्यात वाट माझी भाव...