Saturday, 7 March 2026

वाट माझी

वाट माझी वळणाची 
हिरव्या पानात
वाट माझी सजलेली 
निबीड रानात 

वाट माझी नागमोडी 
डोंगर दऱ्यात
वाट माझी बाभळीच्या 
सघन खोऱ्यात

वाट माझी भाव वेडी 
सुरेल गाण्यात 
वाट माझी चकाकती 
चांदण्यांची रात

वाट माझी नेते मला 
आनंदाच्या देशी
वाट माझी मोकळ्या 
निरभ्र आकाशी

वाट माझी त्याच्या पाशी 
येऊन थांबते
वाट माझी त्याची एक 
कविता सांगते...

- जुई 

Friday, 6 March 2026

सावली

या गर्द सावलीमध्ये
वारा वाजवतो पावा
त्या उनाड दिवसामध्ये
क्षणभर तोच विसावा

आंब्याच्या झाडावरती
सजतो मोहोर सोनेरी
दरवळतो वाऱ्यावरती
मावळत्या तप्त दुपारी

कोवळे ऊन बागडते 
पाना पानावर झाडाच्या 
मातीत गिरवल्या गोष्टी 
दारातल्या उंच माडाच्या 

त्या उष्ण दुपारी सुचते 
ग्रीष्मावर शीतल गाणे
पानांवर लिहिता लिहिता
सावलीत हरवून जाणे 

- जुई 

Wednesday, 4 March 2026

येता जाता

बकुळाचा सडा सांडतो 
त्या वाटेवर येता जाता 
सुंगध त्याचा स्नेह पेरतो
त्या वाटेवर येता जाता 

इवल्या चिमण्या टिपती दाणे 
किलबिल असते येता जाता 
पाण्याचा मग खेळ चालतो 
मौज रोजची येता जाता 

एक चिमुकली गोड गोजिरी 
निरखून बघते येता जाता 
इवल्या चिमण्या पाहत असते 
खुदकन हसते येता जाता 

शुभ्र पांढरी मांजर तेथे 
समोर येते येता जाता 
मला पाहते, मान वळवते 
अशी बिलगते येता जाता 

टपोर डोळे, निळे सावळे
तिचे सांगती येता जाता 
मी वाटेवर पुन्हा थांबते 
तिला शोधते येता जाता 

- जुई 

Friday, 10 October 2025

१२६. माझ्या मना

माझ्या मना लाभो तुला आंनदाचे देणे
माझ्या मना नको शोधू कुणातले उणे
माझ्या मना रमावे तू समाधानाकाठी
माझ्या मना जपावे तू तुला स्वतः साठी
माझ्या मना छंद दे रे उदासीन क्षणी
माझ्या मना धैर्य दे रे  नको डोळा पाणी
माझ्या मना तुझ्यासाठी तूच गाणे गावे
माझ्या मना तुझ्यापाशी मी ही शांत व्हावे
माझ्या मना शोध तुझा तूच घे एकदा
माझ्या मना आठव तू जिकंले  कितीदा
माझ्या मना नको होऊ बैचेन अवेळी
माझ्या मना रीती तुझी भरेल  पोकळी
माझ्या मना आठव तू मागची कहाणी
तुझ्यासाठी आनंदात असते रे कोणी 

- जुई 

Tuesday, 5 August 2025

१२५. तळ्याकाठी...

वाटेत आहे एक तळे
त्या निळ्या तळ्याकाठी
रोज पाहुणे येते कोण
कोण येते कशासाठी
तळ्याकाठी डोलत असती
इवली पिवळी गवतफुले
झाडांच्या असतात कमानी
सजते त्यात निळे तळे
तळ्यात असते मध्ये मध्ये
कमळाची लोभस नक्षी
तळे पाहते आकाशीचे
उडणारे सुंदर पक्षी
तळ्यास पडते आता
मनामध्ये एक कोडे
कशासाठी, कोणासाठी
कोण येते माझ्याकडे 
तळे म्हणजे एक जग
एक विश्व कोणासाठी
तेव्हा कळले तळ्याला
येती कोण तळ्याकाठी

- जुई 🌼

Thursday, 24 July 2025

१२४. एवढेच मागे उरते



आषाढ घेऊनि आला
घन गर्द निळ्या आकाशी
वाहून आणल्या कोणी
भरून जळाच्या राशी


सजलेला श्रावण गातो
मृदू मालकंस, मल्हारी
हरवून दवाच्या मागे
यमनामधल्या ओळी


नक्षत्राच्या वर धरती
चमचमत्या दीप माळा
मिळे धरेला तृप्ती मग
पूर्ण होतसे सोहळा


त्या रिक्त मोकळ्या गगनी
मग रंगीत कमान  धरते
त्या अधीर कातर वेळी
एवढेच मागे उरते...

- जुई

Sunday, 4 May 2025

१२३. आई म्हणले

तिखट मीठ साखर दाणे
ताटात नकळत चवी पेरणे 
भाज्या, डाळी, पुरणपोळी
प्रत्येक घासात तिचे भेटणे

घराघरांना सहज जोडते
हिरवे अंगण घरामधले
आनंदाच्या भरात खुलते
सुरेख विणते घरटे इवले

गृहपाठ, डबा, पुस्तक, पाढे 
कविता, निबंध, मोठे धडे
शाळा, कॉलेज, करियर पुढे
सारे नियोजन तिच्याकडे

ओढ, अश्रू, बोलके डोळे
अत्तर मायेचे असे वेगळे
आठवले असे नाते कुठले
तिने क्षणात "  आई  " म्हणले...

जुई

वाट माझी

वाट माझी वळणाची  हिरव्या पानात वाट माझी सजलेली  निबीड रानात  वाट माझी नागमोडी  डोंगर दऱ्यात वाट माझी बाभळीच्या  सघन खोऱ्यात वाट माझी भाव...