Wednesday, 30 September 2020

४१. उत्तर काही मिळत नाही

भेगाळलेलं शिवार त्यात भावनांची कोरड
खरवडलेल्या घशाची पाण्यासाठी तडफड 
दारिद्र्याचे वास्तव रोज रोज सलत
प्रश्न पडतात मनाला पण उत्तरं काही मिळत नाही 

मातीतली ठिगळं त्यात रुतलेले तन
अंधारात बुडलेला विहिरीचा तळ
कोलमडून बळीराजा कसा काय हरतो
जवळ करतो मृत्यू त्याला जगण का दिसत नाही 

वकिलाचा मुलगा वकील, डॉक्टरचा डॉक्टर
नाहीतर इंजिनीअर नाहीतर कलेक्टर
काहीच नाही तर नुसता पदवीधर
शेतकऱ्याच्या पोराला मात्र असे का वाटत नाही 

कधी बरसणार तो या नव्या उमेदीवर
जेव्हा रेताडलेल्या मातीतून अंकुर फुटते धरणीवर
निसर्गच शिकवतो जगण्याचे सत्वर
उत्तरं असतात समोर पण प्रश्न काही संपत नाही ...

- जुईली अतितकर

Monday, 28 September 2020

२५. ओंजळ


भेटावी आकस्मित वाट निराळी
मांडून ठेवलेली पुस्तकी मांदियाळी

सोबत तेवढी शब्दाची जुळणी
हाक मारुनी बोलावते लेखणी 

जिव्हाळा जडला नियतीची खेळी
पुरती आज भरली अनुरागाने झोळी

जुईची सुवासिक माला कळ्यांची 
राहावी भरुनी ओंजळ ही सुखाची

- जुईली अतितकर

Sunday, 20 September 2020

२६. बाबा


नदीकाठी तो उभाच होता 
नव्या प्रवाहाच्या शोधात

पाहिले होते, साठले होते
ठेवले होते सारे मनात

मेहनतीच्या तरफयाने
जायचे होते दूरच्या गावात

पाय मात्र अडकून राहिले
बाबा नावाच्या बंदरात 

- जुईली अतितकर

Tuesday, 15 September 2020

२४. माझी कविता


कवितेचा तू रचनाकार
लेखणीने केले स्वप्न साकार
प्रेरणा घेतली शब्दातून
गवसले जीवनाचे सार
कवितेचे जग पाहिलेला
तू एक कवी 
एक गजलकार

- जुईली अतितकर

Monday, 14 September 2020

३८. उत्तरे मिळावी


निसर्गातली असे भाषा निराळी
मुक्या पावसाला उत्तरे मिळावी

जुळाव्यात मैत्रीतल्या आज रेषा
नि काव्यास माझ्या उत्तरे मिळावी

सलोखा जपावा न काही अपेक्षा
दुरावा बहाणा फक्त उत्तरे मिळावी

मर्यादा तिथेही निराशा च सीमा 
परीक्षा अशी की उत्तरे मिळावी

- जुईली अतितकर

Saturday, 12 September 2020

२७. असेल का रे


अशा इथे या तरु लतांना
बहार साधा नसेल का रे 
असेल का रे...

सरी जशा या भिजवुन सांगे 
इंद्र धनुचे रंग सारे
कमान का रे...

सुवास माती भरून वाहे 
सुखात रोपे नहात आहे 
इथेच का रे...

दिसेल आता नवीन काही 
पाऊस गाणे मनात राही 
तसेच का रे...

- जुईली अतितकर

Friday, 11 September 2020

२३. न कळले कधी


न कळले कधी....
घरटी झाली लहान...
पंख फुटले अजाण..
गुरफटला पिसारा
सावरून आज...
बागडणे अंगणी
मनी रंगाचा साज... 
न कळले कधी...

- जुईली अतितकर

२२. बोलत नाही तो कधीच


बोलत नाही तो कधीच
चूक तुझी ही नाही ...
कळी फुलणार होती 
पण फुल राजी नाही ...
बोलत नाही तो कधीच
पानगळ झाली कशी...
मोहर आला होता
बहर आला नाही ...
बोलला असता तो तर
कळी फुलली असती ...
पानगळ झाली नसती
पुन्हा ती मोहरली असती ...
पण बोलत नाही तो कधीच...

- जुईली अतितकर

२८. तो क्षण


तो क्षण आजही पाहतो वाट 
वाट आपल्या भेटीची 
उरली सुरली रंगून स्वप्ने 
स्वप्ने रचली प्रीतीची
नसला सरला दाह मनाचा
मनाचा ध्यास विरला ही 
पुन्हा एकदा रंग बरसले 
बरसले होते मज देही

- जुईली अतितकर

Saturday, 5 September 2020

२९. जिजाई

रणांगण तिने नसेल पाहिले
परी जिंकली एक लढाई
रचला सोनेरी इतिहास
बनूनि एक शिवाई
संस्कारांचे बीज रोवले
झाली शिवबाची आई
स्त्री शक्तीची आग उसळली
भेटली स्वराज्याला " जिजाई "
शिवबा येईल इतिहासातील
पुन्हा जिजाऊ घडणे नाही...

- जुईली अतितकर

वाट माझी

वाट माझी वळणाची  हिरव्या पानात वाट माझी सजलेली  निबीड रानात  वाट माझी नागमोडी  डोंगर दऱ्यात वाट माझी बाभळीच्या  सघन खोऱ्यात वाट माझी भाव...