Sunday, 9 March 2025

११७. अंगाई


आज वारा ही वाहतो अवकाशी बघ संथ 
गाईन अंगाई बाळा तू झोप ना रे शांत 

कसला हा हट्ट तुझा मजला आज का कळेना
हरवलेले हास्य तुझे मजला का मिळेना 
मनी काय ठेऊन बसलासी तू सांग  खंत....

परी कथेतून फिरवते बघ आज मी तुला
बोट घट्ट पकडून ठेव सोडू नको मला
नव्या वाटा नव्या दिशा पाहू नवा प्रांत...

नेहमी का रडणे तुझे ऐकून मी बावरते
झोप तुला नसली की मन माझे का घाबरते
तुला का वाटत नाही निजावे मी ही शांत

गाणे ही जमत नव्हते शिकली ना रे बाळा
तूच मग का घेतोस सारखी माझी रे शाळा
एकदा माझं म्हणणं ऐक नको पाहुस अंत

बघ वर आकाशात चंद्र चांदण्या ही आल्या
वेली वरच्या जाई, जुईच्या कळ्या ही निजल्या
तरीही का मिटले नाही डोळे तुझे निवांत

- जुईली अतितकर

No comments:

Post a Comment

वाट माझी

वाट माझी वळणाची  हिरव्या पानात वाट माझी सजलेली  निबीड रानात  वाट माझी नागमोडी  डोंगर दऱ्यात वाट माझी बाभळीच्या  सघन खोऱ्यात वाट माझी भाव...