एक चिमुकली उभी ठाकली
कळकट मळकट झग्यामधे
मागायाला गेले होते
जपून होते मनामधे
उंच उंच तो कळस पाहिला
फुलाफुलांनी सजलेला
चार वेगळी फुले माझी ही
चरणापाशी देवाला
एकच फुल मी उभे पाहिले
होते नजीक मखमाली
रंग निराळे होते आणि
सुक्या पाकळ्या भवताली
क्षणात वाटे त्याच्यापाशी
काय असे जे मागावे
फुले तशीही चारच होती
एक वाटले तिज द्यावे
तीनच उरली हातात फुले
भेटीला या जाताना
हसू आठवे तेव्हा मजला
एक फुल ते देताना
धावत मागे मागे आले
शोधत शोधत कुठे कुठे
दिसली होती तीच चिमुकली
शेजारीच त्या पाणवठे
तीन फुले मी अशी वाहिली
तिच्या फाटक्या झग्यामधे
सुक्या पाकळ्या फुलून आल्या
देव पहावा कुणी कुठे
- जुईली अतितकर
No comments:
Post a Comment