Saturday, 17 April 2021

८९. परी हासरी



रूप भाबडे पडले कोडे 
असे कसे मज गणित सुटेना
वाढत गेले, कधी निरंतर, 
अंतर तिथले तरी मिटेना

तिच्या निराळ्या रेखीव नजरा 
कधी मला ही भेदून गेल्या 
काळोखाच्या चादरीत ती 
दडून बसते कशी  दिसेना 

वाचायला बरेच सोपे 
गूढ कहाणी तिचीच होती
सोडवलेले गणित सुटले
जुना मामला तरी सुटेना

आहे जे जे पुढ्यात ते ते 
मांडुन सारे खेळ रंगला
भातुकलीचा एक कोपरा 
मनासारखा तरी बसेना

पानगळीच्या मोसमातली 
तिची मागणी एकच होती
एक हासरी परी जवळची 
रुसून बसली पुन्हा हसेना


- जुईली अतितकर 

No comments:

Post a Comment

वाट माझी

वाट माझी वळणाची  हिरव्या पानात वाट माझी सजलेली  निबीड रानात  वाट माझी नागमोडी  डोंगर दऱ्यात वाट माझी बाभळीच्या  सघन खोऱ्यात वाट माझी भाव...